महाड मध्ये दोन वासुदेवांची स्वारी पोलिस ठाण्यात
महाड, ता .१३
गाव जागवत येणाऱ्या वासुदेवांच्या स्वारीला महाडमध्ये मात्र पोलिस ठाण्याची वारी करावी लागली आहे . वृध्देची फसवणूक केल्या प्रकरणी दोघा वासुदेवांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
महाड शहरामधील घरात एकटीच असलेल्या वृद्ध महिलेला करणी दूर करण्याच्या बहाण्याने पैसे घेतल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पहाटे लोकांना आपल्या मधुर वाणीने जागे करणाऱ्या वासुदेवावर फसवणूक केल्यामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली आहे.महाड शहरातील तांबड भुवन परिसरात 12 फेब्रुवारीला दोघा वासुदेवांनी तक्रारदार दीपक रामचंद्र पवार यांची सासू प्रज्ञा प्रफुल्ल गुरव या घरात एकट्या असल्याचे पाहून त्यांचा विश्वास संपादन केला. प्रज्ञा गुरव यांना त्यांच्यावर करणी असल्याचे सांगून फसवणूक करत 3 हजार 600 रुपये उकळले. हा प्रकार प्रज्ञा यांचे जावई दीपक रामचंद्र पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी महाड शहर पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार महाड मध्ये फिरणाऱ्या दोन वासुदेवांना ताब्यात घेतले आहे. लखन अशोक गोंड (वय 35 . जोशीवाडा – बारामती ) व ज्ञानेश्वर कचरू गंगावणे ( वय 32 ,मेडद बारामती ) अशी या वासुदेवांची नावे आहेत . या दोघांकडून पोलिसांनी 43 हजार रुपये ताब्यात घेतले आहेत. प्रज्ञा यांच्यासह इतर साक्षीदारांची देखील फसवणूक झाल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगून ज्यांची ज्यांची अशा प्रकारे फसवणूक झालेली आहे त्यांनी महाड शहर ' पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन देखील केले आहे.
.............

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा