महाडमध्ये लवकरच नगरपालिकेची प्रशस्त इमारत
महाड , ता .१४
दीडशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या महाड नगर परिषदेची 8 कोटी रुपये खर्चुन बांधलेली प्रशासकीय इमारत महाड शहरातील शिवाजी चौकामध्ये उभी राहत आहे . या इमारतीमुळे कर्मचाऱ्यांच्या जागेचा प्रश्न सुटणार असून कामकाजही सुलभतेने होणार आहे .
ऐतिहासिक महाड शहराचा विकास आता झपाट्याने होऊ लागला आहे. शहरालगतच्या महाड औद्योगिक क्षेत्र असल्याने महाड मधील बांधकाम व्यवसाय व इतर व्यापाराला चालना मिळू लागली आहे. त्यामुळे महाड शहरातील नगरपालिकेचे कामकाजही वाढू लागले आहे. महाड नगरपरिषदेला दीडशे वर्षाचा इतिहास असून शहरातील तांबट विभागांमध्ये नगरपालिकेची जुनी मजबूत इमारत आहे .परंतु या इमारतीची जागा काळानुसार आता अपूरी पडू लागली आहे. तसेच पालिकेच्या आवारा मध्ये वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने तेथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत असते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी प्रशस्त असे सभागृह नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महाड नगरपालिकेची प्रशासकीय भवन असावे. यासाठी नगरपालिकेचा प्रयत्न सुरू होता. परंतु आता हा प्रश्न सुटला आहे महाड नगरपालिकेने शहरातील छं .शिवाजी चौकात म्हणजेच मध्यवर्ती ठिकाणी नगरपालिकेचे भव्य प्रशासकीय भवन उभारले आहे. या इमारतीचे इंटेरियरचे काम होणे बाकी असून काही महिन्यातच नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होईल. या नगरपालिकेच्या इमारतीसाठी पालिकेच्या विकास निधीतून सात कोटी 70 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत .याशिवाय इंटेरियर साठी साडेसहा कोटी रुपये खर्च होणार असून यासाठी तांत्रिक मान्यता घेण्यात आलेली आहे. लिफ्टचे काम सुरू करण्याच्या निविदाही मागविण्यात आलेल्या आहेत. या नगरपालिकेच्या इमारतीत प्रशस्त असा प्रशासकीय विभाग असेल. शिवाय तळमजल्यावर गोदाम. विविध खात्यांच्या सभापतीसाठी कक्ष. नगराध्यक्ष यांसाठी स्वतंत्र कक्ष तसेच सर्वसाधारण सभेसाठी मोठे सभागृह, अभिलेख कक्ष व दोन विश्रामगृह असा या इमारतीमध्ये समावेश असणार आहे याशिवाय इमारतीच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था असल्याने येथे येणार्या नागरिकांची ही सोय होणार आहे. नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारती मुळे पालिकेतील कामकाज सुलभ व जलद गतीने होण्यास मदत होणार आहे
......
नगरपालिकेच्या प्रशासकीय भवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. इंटेरिअर डिझायनिंग साठी तांत्रिक मान्यताही घेण्यात आलेली आहे .लवकरच या ठिकाणी नगरपालिकेचे कार्यालय स्थलांतरित होईल _ सुहास कांबळे (नगर अभियंता ,महाड नगर परिषद )




