आता अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्रीवर्धन ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळे
रायगड , ता .१४
जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड-जंजिरा आणि श्री .वर्धन या पर्यटनस्थळांना ‘ब वर्ग’ पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात येत असल्याची घाेषणा नुकतीच शासनाने केली आहे . यामुळे रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळणार आहे.
मुंबई, पुण्यापासून जवळ असलेल्या रायगड जिल्ह्यातील या पर्यटनस्थळांच्या विकासास चालना देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. यास पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.या पर्यटनस्थळांना आता 'ब' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्याने शासनामार्फत येथे विविध पर्यटन सुविधा, पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. यामुळे येथील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. अलिबाग हे विस्तृत समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. समुद्रातील शिवकालीन ऐतिहासिक कुलाबा किल्ला, सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांची समाधी, 150 वर्षे जुनी ब्रिटीशकालीन वेधशाळा, श्री कनकेश्वर, श्री सिद्धेश्वर, श्री रामेश्वर, श्री बालाजी मंदिर, श्री काशी विश्वेश्वराचे मंदीर इत्यादी शिवकालीन पुरातन मंदिरे, ज्यू समाजाचे प्रार्थना मंदीर, हिराकोट किल्ला व तलाव, खांदेरी-उंदेरी किल्ले इत्यादी ऐतिहासिक पर्यटनस्थळे येथे आहेत. त्याचप्रमाणे मुरुड - जंजिराची भौगोलिक स्थिती आकर्षित करणारी आहे. शहरात प्रवेश करतानाच नवाबी नजाकतीचा राजवाडा दृष्टीस पडल्यानंतर पुढे अथांग अरबी समुद्र आहे. समुद्रात पद्मदूर्ग आणि विलोभनीय मुरुडचा समुद्र किनारा दृष्टीपथास पडतो. शहराच्या वेशीवर श्री कोटेश्वरी ग्रामदेवतेचे तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी श्री भोगेश्वर मंदीर तसेच श्री लक्ष्मी नारायण व इतर पुरातन मंदिरे आहेत. मुरुड-जंजिरा हा ऐतिहासिक जलदूर्ग असून या जलदूर्गास देशविदेशातील लाखो पर्यटक भेट देतात. जवळच असलेले फणसाड अभयारण्य आणि खोकरी टॉम्ब हीदेखील पर्यटकांची आकर्षणस्थळे आहे. श्रीवर्धन शहरात कालभैरव, जीवनेश्वर, सोमजादेवी, कुसुमावती इत्यादी देवस्थाने व पेशवे मंदीर इत्यादी वास्तू पेशवाई किंवा त्या अगोदरच्या काळातील आहेत. तसेच श्रीवर्धन येथे सुमारे 4 किमी लांबीचा नयनरम्य असा समुद्रकिनारा असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात.राज्य शासनामार्फत कोकणातील पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनामार्फत "बीच शॅक" धोरणास नुकतीच मंजूरी देण्यात आले आहे. या धोरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील वर्सोली समुद्रकिनारा आणि श्रीवर्धन येथील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याचा विकास करण्यात येणार आहे. कोकणातील इतर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांचाही या धोरणांतर्गत विकास करण्यात येणार आहे.
..........

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा